डीईएसच्या इनक्युबेशन सेंटरचे उद्घाटन
डीईएसच्या इनक्युबेशन सेंटरचे उद्घाटन
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे 'डीईएस इनक्युबेशन सेंटर' लालबहादूर शास्त्री रस्त्यावरील 'टिळक भवन' येथे सुरू करण्यात आले.
पितांबरी प्रॉडक्टसचे रवींद्र प्रभूदेसाई आणि प्रबोध उद्योगचे मोहन गुजराती यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सोसायटीच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष प्रमोद रावत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, इनक्युबेशन सेंटरचे अध्यक्ष ॲड. गणेश हिंगमिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रावत म्हणाले, "सामाजिक आणि आर्थिक मूल्य निर्मिती करण्याची क्षमता असणाऱ्या प्राथमिक अवस्थेतील स्टार्टअपचे यशस्वी उद्योग-व्यवसायात रुपांतर करण्यासाठी आवश्यक असणारे सहाय्य या केंद्राद्वारे केले जाणार आहे. आधुनिक पायाभूत सुविधांसह सुसज्ज असणाऱ्या या केंद्राद्वारे समुपदेशन, कायदेशीर व आर्थिक मार्गदर्शन, भांडवल निर्मिती, तांत्रिक आणि नेटवर्किंग या विषयांतील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत."
गुजराती म्हणाले, "अधिकाधिक युवकांनी स्वयंरोजगार केला पाहिजे. तो करत असताना सुरूवातीच्या काळात पायाभूत सुविधांसाठी मोठा खर्च येतो. अशा उद्योगांसाठी हे इनक्युबेशन केंद्र उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो."
प्रभूदेसाई म्हणाले, "स्वतःचा शोध लागला पाहिजे. सृजनशील आणि नाविन्यपूर्ण कल्पनांमुळे व्यवसाय वाढतो. शिक्षणाबरोबर संशोधनाला महत्त्व आहे. शासनाने उद्योजकांना संशोधनासाठी निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे."
प्रा. ॲड. गणेश हिंगमिरे यांनी इंक्युबॅशन सेंटर हे डीईएसच्या माध्यमातून उद्योगांना चालना मिळावी या उद्दिष्टाने स्थापन केले आहे असे प्रास्ताविकात सांगितले. ऍड. श्रीनिधी रास्ते यांनी सूत्रसंचालन आणि डॉ. नंदिनी कोठारकर यांनी आभार प्रदर्शन केले.
Comments
Post a Comment