दुसर्या ‘डॉक्टर्स प्रिमिअल लीग’ राष्ट्रीय अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेचे १७ एप्रिल पासून आयोजन !!
पुणे, १४ एप्रिलः यंग डॉक्टर्स लीग तर्फे दुसर्या ‘डॉक्टर्स प्रिमिअल लीग’ राष्ट्रीय अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १७ ते २१ एप्रिल २०२४ या कालावधीमध्ये होणार आहे. या स्पर्धेत देशभरातुन विविध राज्य आणि जिल्ह्यांतील १६ डॉक्टर्सचे संघ सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना यंग डॉक्टर्स लीगचे संस्थापक सदस्य आणि लहान मुलांचे न्युरोलॉजिस्ट आणि एपिलेप्टोलॉजिस्ट डॉ. संदीप पाटील आणि शहाराचे प्रसिध्द एमडी फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉ. सुमित अग्रवाल यांनी सांगितले की, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांसाठी आणि क्रिकेटप्रेमींसाठी तसेच त्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी, संधी देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेव्दारे डॉक्टरांच्या तंदुरूस्तीला प्रोत्साहन देणे आणि एक सकारात्मक संदेश देणे, हा मुख्य हेतु आहे.
ही स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखाना क्लब, पुना क्लब, येवलेवाडी येथील ब्रिलीयंट्स स्पोटर्स अॅकॅडमी आणि मुंढवा येथील लिजंड्स स्पोटर्स अॅकॅडमी येथील मैदानावर होणार आहे. या स्पर्धेत देशभरातुन १६ डॉक्टरांचे संघ सहभागी झाले असून ही स्पर्धा साखळी आणि बाद फेरीमध्ये घेण्यात येणार आहे. पांढर्या चेंडूवर होणार्या या स्पर्धेत २८ साखळी सामने होणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना २१ एप्रिल रोजी लिजंड्स स्पोटर्स अॅकॅडमी येथे होणार आहे.
गतविजेता दिल्ली संघ, पंजाब, राजस्थान आणि केरळ या राज्यांतून तसेच, महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यातुन १६ संघ सहभागी होणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्या संघाला आणि उपविजेत्या संघाला रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि करंडक मिळणार आहे. या शिवाय स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज तसेच उदयोन्मुख खेळाडू यांना करंडक व सन्माचिन्ह तर, मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू याला करंडक आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर अशी पारितोषिकांची रेलचेल या स्पर्धेत असणार आहे.
डॉ. संदीप पाटील आणि डॉ. सुमित अग्रवाल पुढे म्हणाले की, या स्पर्धेत जेवढ्या धावा करण्यात येतील तेवढ्याच संख्येनी वृक्षारोपणाचाही आमचा निर्धार आहे. स्पर्धेत केलेल्या धावांच्या बरोबरीने झाडे लावून एक सामाजिक जबाबदारीही आम्ही पूर्ण करणार आहोत. यातून पर्यावरण संवर्ध नाचा संदेश देण्याचा आमचा हेतु आहे.
डॉ. संदीप पाटील आणि डॉ. सुमित अग्रवाल यांच्या जेनोबिक्स फाऊंडेशन, यंग डॉक्टर लीगचे डॉ. अमित द्रविड, डॉ. नितीन पाटील, डॉ. दीपक मानकरी, डॉ. राहुल पाटील, डॉ. वैभव दूधट, डॉ. अंकुश भंडारी यांचा समावेश असलेल्या संयोजन समितीने डॉ. नितीन गडकरी आणि डॉ. विवेक बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे.
या स्पर्धेला सह्याद्री हॉस्पिटल, मुंबई ऑन्कोलॉजी असोसिएशन, एमक्युअर सीएसआर, नेटपल्स् सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड, एशिनय इन्स्टिट्युट ऑफ हेअर ट्रान्सप्लांट यांनी प्रायोजित केले असून ही स्पर्धा आरोग्य आणि सामाजिक कल्याणासाठी वचनबद्ध असलेल्या इतर मान्यवर भागीदारांमुळे शक्य झाली आहे.
Comments
Post a Comment