पहिली ‘इंडियन डॉक्टर्स ऑलिंपिक’ राष्ट्रीय स्पर्धाव्हॉलीबॉल स्पर्धेत पुण्याच्या उदगीर वॉरीयर्स संघाला विजेते
पुणे, ६ डिसेंबरः यंग डॉक्टर्सं लीग (वायडीएल) यांच्या तर्फे आयोजित देशातील पहिल्या ‘इंडियन डॉक्टर्स ऑलिंपिक’ राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या उदगीर वॉरीयर्स संघाने पीएचडीए शिवाजीयन्स् संघाचा २-१ असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद संपादन केले.
डेक्कन जिमखाना क्लब मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या संघर्षपूर्ण झालेल्या अंतिम सामन्यात उदगीर वॉरीयर्स संघाने विजयासाठी प्रयत्नांची शर्थ केली. महेश धुमाळ, संकेत वाघमोडे, सागर बेनकी, मेघराज हांडे, ऋषी पावडे, रोहीत गुजराथी यांच्या सांघिक आणि नियोजनबद्ध अचूक खेळामुळे उदगीर संघाने विजयश्री खेचून आणली. शिवाजीयन्स् संघाच्या निहार सावंत, अतुल झोलेकर, विशाल भानुसे, प्रणव कदम, चिन्मय राठोड आणि विक्रम पाटील यांनी प्रत्येक गुणांसाठी कडवी झुंझ दिली.
पहिला सेट उदगीर संघाने २५-२१ असा ४ गुणांच्या फरकाने जिंकला. दुसर्या सेटमध्ये शिवाजीयन्स् संघाने २५-१९ गुणांसह जिंकून सामन्यामध्ये १-१ अशी बरोबरी केली. निर्णायक सेटमध्ये उदगीर संघाने आपला खेळ उंचावून १३ गुणांच्या फरकाने २५-१२ असा सेट जिंकत सामन्यात बाजी मारली.
उपांत्य फेरीच्या सामन्यात उदगीर वॉरीयर्स संघाने पीएचडीए सुपरकिंग्ज् संघाचा २५-२१, २५-१९ असा तर, पीएचडीए शिवाजीयन्स् संघाने पीपीडीए मास्टर्स संघाचा २५-१२, २५-१० असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. व्हॉलीबॉलमध्ये पुणे, अहमदनगर, मराठवाडा, कोल्हापूर येथून एकूण १० संघ सहभागी झाले होते.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण ‘इंडियन डॉक्टर्स ऑलिंपिक’ (आयडीएल) समितीचे अध्यक्ष डॉ. नचिकेत महींद्रकर आणि सचिव डॉ. अमित द्रविड, डॉ. चिन्मय सराफ यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या आणि उपविजेत्या संघांना करंडक आणि पदके देण्यात आली.
अंतिम सामन्याचा निकालः
उदगीर वॉरीयर्स वि.वि. पीएचडीए शिवाजीयन्स् २५-२१, १९-२५, २५-१२;
उपांत्य फेरीः उदगीर वॉरीयर्स वि.वि. पीएचडीए सुपरकिंग्ज् संघ २५-२१, २५-१९;
पीएचडीए शिवाजीयन्स् वि.वि. पीपीडीए मास्टर्स २५-१२, २५-१०;
Comments
Post a Comment