राहुल गांधींच्या पाठिंब्यामुळे MPSC आंदोलनाला नवी ऊर्जा; भीमनवारांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही – विद्यार्थ्यांचा निर्धार
राहुल गांधींच्या पाठिंब्यामुळे MPSC आंदोलनाला नवी ऊर्जा; भीमनवारांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही – विद्यार्थ्यांचा निर्धार
पुणे, प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षांमधील कथित गैरप्रकार, पेपरफुटी, रखडलेल्या भरती प्रक्रिया आणि ७० हजारांहून अधिक रिक्त पदांच्या भरतीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता राष्ट्रीय पातळीवर मोठा पाठिंबा मिळत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आंदोलनाला उघड पाठिंबा दिल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आंदोलनाला नवी ताकद प्राप्त झाली आहे.
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत स्पष्ट शब्दांत म्हटले की, पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी पेपरफुटी, रखडलेल्या भरती, महागडे शिक्षण, वसतिगृहांच्या समस्या आणि परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना MPSC मध्ये सुधारणा आणि पारदर्शकता आणण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यावर अपेक्षित कारवाई न झाल्याने विद्यार्थी पुन्हा सत्याग्रहाच्या मार्गावर उतरले आहेत. राहुल गांधी यांनी MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याची आणि ७० हजारांहून अधिक रिक्त सरकारी पदे तातडीने भरण्याची मागणी योग्य असल्याचे सांगत “आश्वासन नव्हे, कृती हवी” अशी भूमिका मांडली. तसेच युवक काँग्रेस आणि NSUI ला विद्यार्थ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्याचे आवाहन केले.
राहुल गांधी यांच्या भूमिकेनंतर आंदोलनाला काँग्रेस पक्षाची अधिकृत ताकद मिळाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, युवा नेते विश्वजित कदम तसेच युवक काँग्रेस आणि NSUI चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनाच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. विविध स्तरांवरून मिळणाऱ्या या पाठिंब्यामुळे आंदोलन राज्यव्यापी चर्चेचा विषय बनले आहे.
याच पार्श्वभूमीवर NSUI महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष अक्षय कांबळे यांनी राहुल गांधी यांच्या पाठिंब्याचे स्वागत करत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
"MPSC मधील गैरप्रकार, पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेल्या खेळाविरोधात NSUI पहिल्या दिवसापासून रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे. गेल्या दीड महिन्यांपासून या आंदोलनाच्या प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक लढ्यात आणि पेपरफुटीचे सत्य राज्यासमोर आणण्याच्या प्रयत्नांमध्ये NSUI आणि काँग्रेस पक्ष ताकदीने विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा आहे. राहुल गांधी यांनी या आंदोलनाला दिलेला पाठिंबा आणि X वरील त्यांचे ट्विट हे लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण आहे. त्यांच्या भूमिकेमुळे आंदोलनाला नवी ऊर्जा, नवा आत्मविश्वास आणि नवी ताकद मिळाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये पारदर्शकता प्रस्थापित होईपर्यंत, दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आणि अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठीचा हा लढा आम्ही अधिक ताकदीने पुढे नेऊ."
— अक्षय कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष, NSUI महाराष्ट्र
विद्यार्थी नेत्यांनी स्पष्ट केले आहे की, MPSC सचिवांची बदली हा संघर्षाचा एक टप्पा असला तरी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना जबाबदार धरल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.
राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या अपेक्षा या आंदोलनाशी जोडल्या गेल्या असून राहुल गांधींसह काँग्रेस नेतृत्वाच्या सक्रिय सहभागामुळे या लढ्याला नवे राजकीय आणि सामाजिक बळ मिळाल्याचे चित्र दिसत आहे. आंदोलन आता केवळ विद्यार्थ्यांचे न राहता रोजगार, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वासाठीचा व्यापक संघर्ष बनत असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment