सजगपणे आनंदाचे क्षण टिपणे आवश्यक : मानसी कुलकर्णीरंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त विशेष मुलाखत व सन्मान

सजगपणे आनंदाचे क्षण टिपणे आवश्यक : मानसी कुलकर्णी
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त विशेष मुलाखत व सन्मान 

पुणे : आयुष्यात छोटे-छोटे सकारात्मक बदल करत सजगपणे आनंदाचे क्षण टिपणे आवश्यक आहे. स्वत:ला आनंद मिळविण्यासाठी स्वत:ला वेळ देणे, ध्यानधारणा करणे, कामातूनही आनंदाची प्राप्ती करणे दिवसातील सर्व व्यवहार सजगतेने सांभाळणे जमल्यास प्रत्येकजण आनंदी राहू शकतो. आयुष्यासाठी, छोट्‌या-मोठ्या घटनांसाठी कृतज्ञ राहणे देखील अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन लाईफ कोच, मानसशास्त्रीय सल्लागार, समुपदेशक मानसी अभय कुलकर्णी यांनी केले.

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मानसी अभय कुलकर्णी यांचा शनिवारी (दि. १०) सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. त्यावेळी संवादात्मक कार्यक्रमात त्या बोलत होत्या. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर आणि सल्लागार प्रज्ञा महाजन यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. मैथिली आडकर मंचावर होत्या. सदाशिव पेठेतील अक्षरवेल सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कुलकर्णी यांच्याशी ॲड. प्रमोद आडकर आणि शिल्पा देशपांडे यांनी संवाद साधला.

मानसी कुलकर्णी पुढे म्हणाल्या, स्वसंवाद करणे, इतरांशी तुलना न करणे यातून नकारात्मकता सकारात्मकतेत बदलता येऊ शकते. या करिता नकारात्मक विचारांच्या भोवऱ्यात न अडकता श्वासावर लक्ष केंद्रीत करत नकारात्मक विचारांना थांबवणे आवश्यक आहे. नातेसंबंधांविषयी बोलताना त्या म्हणाल्या, दुसऱ्याने बदलले पाहिजे ही अपेक्षा सोडून देऊन आपण स्वत:च्या विचारांचा स्वीकार करावा. मन हे विचार करण्याचे माध्यम आहे हे जाणून घेणे गरजेचे असून दोन विरुद्ध विचार एकत्र न आणता सकारात्मक विचारांची वाढ केल्यास आपण आनंदी राहू शकतो. विचारांकडे तटस्थपणे पाहत खरा आनंद आपल्या आतच शोधा असे सांगून अक्षय उर्जेचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविकात मानसिक स्वास्थ्य ही काळाची गरज आहे या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे सांगितले. शिल्पा देशपांडे यांनी सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन केले. 
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आयोजित ‘मन’ या विषयावरील निमंत्रितांच्या कविसंमेलनात प्रभा सोनवणे, तनुजा चव्हाण, स्वप्नील पोरे, स्वप्नील बापट, गोविंद वाकडे, दीपक होमकर, योगेश रांगणेकर, राहुल हातोले, नूतन शेटे, नचिकेत जोशी, निलाक्षी महाडिक, योगेश काळे, मृणालिनी कानिटकर-जोशी यांचा सहभाग होता. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन प्राजक्ता वेदपाठक यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती नको; खडकवासला काँग्रेसचे अध्यक्ष उमेश कोकरे यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आग्रही मागणी

गुलटेकडी येथील SRA प्रकल्पात पारदर्शकता आणून नागरिकांना न्याय द्या; सामाजिक कार्यकर्त्यांची ठाम भूमिका मीनाताई ठाकरे नगर (खड्डा) येथील नागरिकांच्या बैठकीत SRA योजनेतील त्रुटींवर तीव्र चर्चा एकाही झोपडीधारकावर अन्याय होऊ देणार नाही; सामाजिक कार्यकर्त्यांचा नागरिकांना पाठिंबा