शांत, संयत गायनप्रस्तुतीने जिंकली रसिकांची मने साधना कला मंचतर्फे बोस्टनस्थित गायिका सोनाली दांडेकर-तांबे यांची विशेष मैफिल


शांत, संयत गायनप्रस्तुतीने जिंकली रसिकांची मने

 

साधना कला मंचतर्फे बोस्टनस्थित गायिका सोनाली दांडेकर-तांबे यांची विशेष मैफिल

 

पुणे : समयोचित रागांची निवड, ज्येष्ठ वाग्गेयकारांच्या बंदिशी निवडण्याचे वेगळेपण आणि शांत, संयत गायनप्रस्तुतीने अमेरिकेतील बोस्टन येथील प्रसिद्ध गायिका, संगीततज्ज्ञ आणि गायनगुरू सोनाली दांडेकर–तांबे यांनी रसिकांची मने जिंकली.

 

साधना कला मंच आयोजित या मैफिलीत रसिकांनी शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय संगीतासह रागमालेचाही श्रवणानंद अनुभवला. कोथरूड येथील हॅपी कॉलनी फेडरेशन सभागृहात ही मैफल रंगली.

 

सोनाली दांडेकर–तांबे यांनी मैफिलीची सुरवात राग झिंझोटीमधील एकतालात निबद्ध आचार्य श्रीकृष्ण रातंजनकर रचित ख्यालाने केली. झिंझोटी रागात ‘सावरो मन भायो, अतही सुख पायो’ ही विलंबित आणि ‘देखो मोरी गगरी छीन लिनी’ ही पं. अरुण कशाळकर यांची बंदिश ऐकविली. रागवाचक सुरावटींतून त्यांनी रागरूपाची मांडणी केली. त्यानंतर राग मालकंसमधील त्रितालातील पं. गजाननबुवा जोशी यांची ‘दया करो अब तुम’ ही रचना आणि पं. काशिनाथ बोडस यांची ‘दुर्गे भवानी’ ही द्रुत बंदिश सादर केली. मैफिलीच्या उत्तरार्धात त्यांनी काही उपशास्त्रीय रचना आणि रागमाला सादर केली. तिलककामोद रागातील ‘नीर भरन’ ही बंदिशकी ठुमरी दाद मिळवणारी ठरली. संत सूरदासांची एक लडिवाळ रचना आणि पाठोपाठ संत तुलसीदासांचे अवधी भाषेतील भजन त्यांनी ऐकवले. या दोन्ही भक्तीरचना पं. विकास कशाळकर यांनी संगीतबद्ध केल्या होत्या.

 

सोनाली यांचे गुरू पं. विकास कशाळकर यांनी नवरात्री उत्सवानिमित्त बांधलेल्या अनोख्या रागमालेचे सादरीकरण सोनाली यांनी नेमकेपणाने केले. दुर्गा, बैरागी, बिभास, भूप, भूपाली तोडी, देशकार, हमीर, जलधर केदार आणि भैरवी अशा रागांत पं. कशाळकर यांनी ही रागमाला संगीतबद्ध केली आहे. देवीची शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंधमाला, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धीदात्री अशी विविध रूपे या रागमालेतून प्रकटली. अतिशय मोजक्या वेळात सोनाली यांनी ते ते राग दर्शवत ही रागमाला रंगवली. पं. दिनकर कायकिणी यांनी भैरवीमध्ये बांधलेल्या ‘तन तनन तन देरेना’ व भैरवी प्रियदर्शिनी या तराण्याने सोनाली यांनी मैफिलीची सांगता केली.

 

त्यांना अमेय बिचू (संवादिनी) आणि ऋषिकेश सुरवसे (तबला) तसेच परिमल (टाळ) यांनी अनुरूप साथसंगत केली. मंजिरी जोशी यांनी निवेदन केले. प्रास्ताविक तसेच कलाकारांचा परिचय साधना कला मंचच्या उपाध्यक्ष प्रतिभा पाठक यांनी करून दिला. संस्थेच्या अध्यक्ष वसुधा कर्दळे यांनी कलाकारांचे स्वागत व सत्कार केले. पं. विकास कशाळकर, गायिका अंजली मालकर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती नको; खडकवासला काँग्रेसचे अध्यक्ष उमेश कोकरे यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आग्रही मागणी

गुलटेकडी येथील SRA प्रकल्पात पारदर्शकता आणून नागरिकांना न्याय द्या; सामाजिक कार्यकर्त्यांची ठाम भूमिका मीनाताई ठाकरे नगर (खड्डा) येथील नागरिकांच्या बैठकीत SRA योजनेतील त्रुटींवर तीव्र चर्चा एकाही झोपडीधारकावर अन्याय होऊ देणार नाही; सामाजिक कार्यकर्त्यांचा नागरिकांना पाठिंबा