विद्यार्थ्यांनी कायद्याचा सखोल अभ्यास करावा*झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. राजेश कुमार यांचे आवाहन ; जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या राष्ट्रीय अधिवेशनात बार कौन्सिलच्या सदस्यांचा सन्मान


*विद्यार्थ्यांनी कायद्याचा सखोल अभ्यास करावा*
झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. राजेश कुमार यांचे आवाहन ; जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या राष्ट्रीय अधिवेशनात बार कौन्सिलच्या सदस्यांचा सन्मान

पुणे : विधी क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असून, बदलत्या काळात समाजातील विविध क्षेत्रांचा कायद्याच्या कक्षेत विस्तार होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कायद्याचा सखोल अभ्यास करून या क्षेत्रातील संधी आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या जाणून घ्याव्यात, असे प्रतिपादन झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. राजेश कुमार यांनी केले. 

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने विधी व्यवसाय आणि करिअरच्या संधींवरील दुसरे राष्ट्रीय अधिवेशन संस्थेच्या नऱ्हे येथील शैक्षणिक संकुलात आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाला न्या. राजेश कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्या. श्रीकांत कुलकर्णी, पुणे कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश न्या. एस. एन. रुक्मे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे उपाध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर, विभाग प्रमुख डॉ. सपना देव उपस्थित होते. 

यावेळी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या उपाध्यक्ष ॲड. रंजना भोसले, माजी अध्यक्ष व सदस्य ॲड. विठ्ठल कोंडे देशमुख, सदस्य ॲड. अहमदखान पठाण, सदस्य व माजी अध्यक्ष ॲड. राजेंद्र बाबुराव उमाप, सदस्य ॲड. राजेंद्र अनभुले, सदस्य ॲड. विकास ढगे पाटील, सदस्य ॲड. माधवी बाळ पोतदार आणि सदस्य ॲड. गणेश शिरसाट या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

न्या. राजेश कुमार म्हणाले, कायद्याशिवाय दैनंदिन जीवनाची कल्पनाही करता येत नाही. ईश्वराच्या नावाने निर्माण झालेला मानवनिर्मित कायदा, समाजनिर्मित कायदा आणि राज्यनिर्मित कायदा असे कायद्याचे प्रकार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी एका समाजाची निर्मिती केली. समाज घडवण्याची आणि संघटितपणे काम करण्याची ही परंपरा महाराष्ट्राच्या संस्कृतीत रुजलेली आहे.

न्या. श्रीकांत कुलकर्णी म्हणाले, अनेक वर्षांच्या मेहनतीतून व्यावसायिक विश्वासार्हता निर्माण होते. विधी क्षेत्रात सुरुवातीच्या कामाला किंवा मेहनतीला लगेच ओळख आणि प्रसिद्धी मिळत नाही. त्यामुळे प्रगतीच्या प्रवासात येणाऱ्या अडथळ्यांमुळे खचून जाऊ नका. यश मिळवण्याची इच्छा ही योग्य आणि न्याय्य गोष्टींप्रती असलेल्या वचनबद्धतेपेक्षा मोठी असता कामा नये. व्यावसायिक आयुष्यात अनेक कठीण प्रसंग येतात. अशा वेळी दबावाखाली किंवा शॉर्टकटच्या मोहात न पडता विधी व्यवसायाच्या मूलभूत तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे.

न्या. एस. एन. रुक्मे म्हणाले, समाज सुदृढ होण्यासाठी आणि त्यात समृद्धी निर्माण होण्यासाठी आदर्श समाजाची निर्मिती होणे आवश्यक आहे. वकिलांनी यासाठी पुढाकार घेतल्यास आदर्श समाजनिर्मितीची प्रक्रिया अधिक वेगाने होऊ शकते. नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी समाजात सकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वतःला सक्षम बनवल्याशिवाय समाजाच्या हिताचे रक्षण करणे शक्य नाही. त्यामुळे वकिलांनी स्वतःची क्षमता विकसित करून समाजहितासाठी योगदान द्यावे.

 ॲड. शार्दुल जाधवर म्हणाले, केवळ परीक्षा उत्तीर्ण होणारे विद्यार्थी घडवणे हे आमचे ध्येय नाही, तर सक्षम, व्यावसायिकदृष्ट्या आत्मविश्वासपूर्ण आणि सामाजिक भान असलेले कायदेतज्ज्ञ घडवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. विधी शाखेची पदवी ही केवळ शैक्षणिक पात्रता नसून समाज आणि देशाप्रती असलेली मोठी जबाबदारी आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती नको; खडकवासला काँग्रेसचे अध्यक्ष उमेश कोकरे यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आग्रही मागणी

गुलटेकडी येथील SRA प्रकल्पात पारदर्शकता आणून नागरिकांना न्याय द्या; सामाजिक कार्यकर्त्यांची ठाम भूमिका मीनाताई ठाकरे नगर (खड्डा) येथील नागरिकांच्या बैठकीत SRA योजनेतील त्रुटींवर तीव्र चर्चा एकाही झोपडीधारकावर अन्याय होऊ देणार नाही; सामाजिक कार्यकर्त्यांचा नागरिकांना पाठिंबा