पद्मश्री शंकर महादेवन यांच्या स्वरात स्वामी समर्थांच्या आदिशक्ती रूपाचा जागर!**स्वामीआई फिल्म्स प्रस्तुत ‘स्वामी आईचा गोंधळ’ या भक्तिगीताचा अनावरण सोहळा उत्साहात संपन्न*

*पद्मश्री शंकर महादेवन यांच्या स्वरात स्वामी समर्थांच्या आदिशक्ती रूपाचा जागर!*

*स्वामीआई फिल्म्स प्रस्तुत ‘स्वामी आईचा गोंधळ’ या भक्तिगीताचा अनावरण सोहळा उत्साहात संपन्न*

पुणे : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील गोंधळ या भक्तिप्रधान संगीतप्रकारातून स्वामी समर्थांच्या आदिमाया, आदिशक्ती स्वरूपाची महती सांगणारे ‘स्वामी आईचा गोंधळ’ हे भक्तिगीत स्वामीआई फिल्म्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पद्मश्री शंकर महादेवन यांच्या स्वराने सजलेल्या या गाण्याला स्नेहल-स्वप्नील या संगीतकार जोडीने संगीत दिले असून, गीतकार मंदार इंगळे यांनी त्याचे शब्द लिहिले आहेत.

या भक्तिगीताचा अनावरण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या प्रसंगी संगीतकार स्नेहल-स्वप्नील, गीतकार मंदार इंगळे, निर्माते अमित बहिरट, दिग्दर्शक हर्षवर्धन जाधव, कथा, पटकथा आणि क्रिएटिव्ह हेड ओंकार मरकळे यांच्यासह संपूर्ण टीम उपस्थित होती.

पारंपरिक गोंधळाला आधुनिक संगीताची​ जोड देणारे हे गीत भक्ती आणि श्रद्धेच्या पलीकडे जाऊन आत्मचिंतन, नात्यांमधील संवेदनशीलता आणि सकारात्मक बदलाचा संदेश देते. गाण्याच्या व्हिडीओमधून आजच्या धकाधकीच्या जीवनातील कामाचा ताण, त्याचा जवळच्या माणसांशी असलेल्या नात्यांवर होणारा परिणाम आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीचे चित्रण करण्यात आले आहे. तसेच, आयुष्यातील कठीण प्रसंगी स्वामी समर्थ विविध रूपांतून मदतीला येतात, या श्रद्धेच्या भावनेसोबतच स्त्रीत्वाचा सन्मानही अधोरेखित करण्यात आला आहे.

या भक्तिगीतामध्ये मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय जोडी अक्षय वाघमारे आणि प्रतीक्षा मुणगेकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. याचे हर्षवर्धन जाधव यांनी दिग्दर्शन केले असून, कथा, पटकथा आणि क्रिएटिव्ह हेड म्हणून ओंकार मरकळे यांनी जबाबदारी सांभाळली आहे. अमित राजेंद्र बहिरट यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे.

हर्षवर्धन जाधव, दिग्दर्शक म्हणाले, “या गाण्याच्या व्हिडीओतून भक्तिभावासोबतच नात्यांमधील संवेदनशीलता आणि स्त्रीत्वाचा सन्मान मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ही भावनिक कथा प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करेल, अशी अपेक्षा आहे.”

ओंकार मरकळे, कथा, पटकथा आणि क्रिएटिव्ह हेड म्हणाले, “आपल्या आयुष्यात देव नेहमी माणसाच्या रूपाने येऊन अडचणीच्या काळात धावून येतो आणि त्याच्या कृपेने संकटांचं मळभ अलगद दूर करतो. हाच श्रद्धा आणि माणुसकीचा भाव या गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे”
 
निर्माते अमित बहिरट म्हणाले, “हा प्रकल्प म्हणजे स्वामी समर्थांनी आम्हाला दिलेली प्रेरणा आहे. त्यांच्या कृपेनेच हा प्रकल्प साकार झाला, अशी आमची श्रद्धा आहे. या प्रकल्पातून मिळणारा व्यावसायिक लाभ आम्ही गरजू मुलींच्या शिक्षणासाठी समर्पित करणार आहोत. या माध्यमातून समाजाप्रती असलेले आमचे कर्तव्य पार पाडण्याचा आणि मुलींच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

भक्ती आणि सामाजिक बांधिलकी यांची सांगड घालण्याच्या उद्देशाने स्वामीआई फिल्म्स या निर्मिती संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. ‘स्वामी आईचा गोंधळ’ ही संस्थेची पहिली निर्मिती असून, यापुढेही दर्जेदार गीते आणि चित्रपटांच्या माध्यमातून आशयपूर्ण कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा संस्थेचा मानस आहे.

या प्रकल्पामागे सामाजिक योगदानाची भावनाही आहे. निर्मात्यांच्या माहितीनुसार, हे मराठीतील सर्वाधिक बजेटच्या सिंगल गाण्यांपैकी एक असून, या प्रकल्पातून मिळणारा आर्थिक फायदा गरजू मुलींच्या शिक्षणासाठी वापरण्यात येणार आहे.

नवरात्रीतील अष्टमीच्या शुभमुहूर्तावर ‘स्वामी आईचा गोंधळ’ हे भक्तिगीत स्वामीआई फिल्म्सच्या अधिकृत YouTube चॅनेलवर प्रदर्शित झाले आहे. 

भक्तिसंगीत आणि सामाजिक संदेश यांचा संगम असलेल्या या गीताला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास निर्मिती टीमने व्यक्त केला आहे.

YouTube video- https://youtu.be/jbWDJvmPMA0?si=Wz5x8u06UTlIDX5H

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती नको; खडकवासला काँग्रेसचे अध्यक्ष उमेश कोकरे यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आग्रही मागणी

गुलटेकडी येथील SRA प्रकल्पात पारदर्शकता आणून नागरिकांना न्याय द्या; सामाजिक कार्यकर्त्यांची ठाम भूमिका मीनाताई ठाकरे नगर (खड्डा) येथील नागरिकांच्या बैठकीत SRA योजनेतील त्रुटींवर तीव्र चर्चा एकाही झोपडीधारकावर अन्याय होऊ देणार नाही; सामाजिक कार्यकर्त्यांचा नागरिकांना पाठिंबा