मुळशीतील माले ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर आरोपांचा बॉम्ब!***माले ग्रामपंचायतीतील कारभाराची जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी!*
*मुळशीतील माले ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर आरोपांचा बॉम्ब!*
**माले ग्रामपंचायतीतील कारभाराची जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी!*
*सरपंच-ग्रामसेवकांच्या कथित संगनमताने बनावट ग्रामसभा, खोट्या सह्या अन् कोट्यवधींच्या अफरातफरीची चर्चा; मुळशीत खळबळ!*
माले, ता. मुळशी : मुळशी तालुक्यातील माले ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर आरोप झाल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या कथित संगनमताने बनावट ग्रामसभा दाखविणे, ग्रामस्थांच्या खोट्या सह्या करून शासन, प्रशासन आणि नागरिकांची फसवणूक केल्याचे आरोप पुढे आले आहेत. एवढेच नव्हे, तर या कथित प्रकारांच्या आडून कोट्यवधी रुपयांची अफरातफर झाल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगू लागली आहे. त्यामुळे माले ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणाचे पडसाद आता तालुक्याच्या राजकीय वर्तुळात उमटत आहेत.
ग्रामसभा प्रत्यक्षात न घेता कागदोपत्री दाखविण्यात आल्या का, ग्रामस्थांच्या नावाने नोंदविण्यात आलेल्या सह्या खऱ्या आहेत की बनावट, तसेच अशा नोंदींच्या आधारे कोणते ठराव मंजूर दाखविण्यात आले, हे प्रश्न या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहेत. ग्रामसभेच्या नोंदी आणि प्रत्यक्षातील वस्तुस्थिती यांत तफावत असल्याचा आरोप गंभीर स्वरूपाचा आहे. या कथित प्रकारांमुळे शासकीय यंत्रणेची दिशाभूल झाली का आणि सार्वजनिक निधीच्या व्यवहारांमध्ये अनियमितता झाली का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या कथित संगनमताचे आरोप आता ऐरणीवर आले असताना, ग्रामपंचायतीच्या कारभाराची जबाबदारी नेमकी कोणाची? ग्रामस्थांच्या सह्यांचा गैरवापर आणि कोट्यवधींच्या कथीत अफरातफरीच्या चर्चेमागील सत्य काय? असे सवाल उपस्थित केले जात आहेत. ग्रामस्थांच्या विश्वासावर चालणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभारात अशा प्रकारचे आरोप होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. आरोपांमधील सत्यता सिद्ध करणारे पुरावे आणि अधिकृत नोंदी समोर येणे, हीच आता या प्रकरणातील निर्णायक बाब ठरणार आहे.
मुळशी तालुक्यातील माले ही मोठी ग्रामपंचायत असल्याने या प्रकरणाचे महत्त्व केवळ गावापुरते मर्यादित राहिलेले नाही. बनावट ग्रामसभा, कथित खोट्या सह्या आणि कोट्यवधींच्या अफरातफरीच्या चर्चेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष माले ग्रामपंचायतीच्या कारभाराकडे लागले आहे. संबंधित आरोपांमुळे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, या प्रकरणातील वस्तुस्थिती आणि जबाबदारी निश्चित होणे महत्त्वाचे ठरणार असून या प्रकरणाचे गांभीर्य दुर्लक्षित करता येणार नाही.
ऍडव्होकेट राजेश सातपुते व ग्रामसदस्य चेतन आधवडे यांनी चौकशी अर्ज केला असून आता जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीतून सत्य बाहेर येऊन दोषींवर कडक कारवाई व्हावी असे सूर संपूर्ण तालुक्यात लोकांकडून चर्चिले जात आहे.
Comments
Post a Comment