भरभरून कौतुक किंवा टोकाची टीका करण्याचा ट्रेंड : सोनाली कुलकर्णी


भरभरून कौतुक किंवा टोकाची टीका करण्याचा ट्रेंड : सोनाली कुलकर्णी

चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक : सोनाली कुलकर्णी

सातव्या मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला पुण्यात सुरुवात

सोनाली कुलकर्णी यांचा पहिल्या स्व. विक्रम गोखले स्मृती पुरस्काराने गौरव

 

पुणे : एखाद्या चित्रपटाचे भरभरून कौतुक करायचे नाहीतर एखाद्यावर इतकी टीका करायची की, त्या व्यक्तीच्या जिव्हारी लागेल, ती व्यक्ती आयुष्यातून उठेल असा दोन्ही टोकाच्या भूमिका घेण्याचा ट्रेंड आज समाजात मोठ्या प्रमाणात दिसून येतो. परंतु एक चित्रपट रसिक, रसास्वाद घेणारी व्यक्ती म्हणून प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक आहे, ज्या योगे आपल्या विचारांना शिस्त लागेल आणि केलेल्या टिकेची नोंदही घेतली जाईल, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केले. मुंबा चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून उत्तम प्रेक्षक निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

मुंबा फिल्म फाउंडेशन आयोजित सातव्या मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास मंगळवारी (दि. ६) सुरुवात झाली. पहिल्या स्व. विक्रम गोखले स्मृती पुरस्काराने ज्येष्ठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना सोनाली कुलकर्णी बोलत होत्या. मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन आणि पुरस्कार वितरण व्ही. शांताराम फाउंडेशनचे अध्यक्ष किरण व्ही. शांताराम यांच्या हस्ते झाले.

या प्रसंगी नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे डायरेक्टर प्रकाश मगदूम, महोत्सवाचे आयोजक जय भोसले, महोत्सव संचालक वीरेंद्र चित्राव, व्यवस्थापकीय संचालक अभिषेक अवचार, अभिनेता करणवीर शर्मा मंचावर होते. महोत्सव राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे होत आहे.

यंदाच्या मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NFDC), फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII), फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी, एमआयटी दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म स्कूल, मराठवाडा मित्र मंडळाचे कॉमर्स कॉलेज, वृत्तपत्र संज्ञापन विभाग यांचे सहकार्य लाभले आहे.

उद्‌घाटन समारंभापूर्वी व्ही. शांताराम यांना आदरांजली वाहणारा, त्यांच्या चित्रपट सृष्टीतील कारकीर्दीचा आढावा घेणारा ‘द पोर्ट्रेट ऑफ अ पायोनियर’ हा लघुपट दाखविण्यात आला.

महोत्सवात सहभागी झालेल्या युवकांशी संवाद साधताना सोनाली कुलकर्णी पुढे म्हणाल्या, युवा पिढीने करिअरच्या संधी निवडताना स्वत:मधील आवाज ओळखायला शिकणे आवश्यक आहे. ज्या क्षेत्रात तुम्हाला रस आहे, त्या क्षेत्रात पाय रोऊन उभे रहा. पुरस्काराच्या निमित्ताने विक्रम गोखले यांच्या आठवणींना उजाळा देताना त्या म्हणाल्या, विक्रमकाकांच्या नावाने मिळालेला पुरस्कार मी अतिशय कृतज्ञतेने स्वीकारत आहे. ‘मुक्ता’ या चित्रपटात त्यांनी माझ्या वडिलांची भूमिका साकारली होती. आज माझ्या वडिलांच्या उपस्थितीत वडिलांप्रमाणे असलेल्या कलाकाराच्या नावाचा पुरस्कार मिळतो आहे याचे विशेष कौतुक आहे.

 

लघुपट, अनुभवपटासाठी अनुदान मिळावे : वीरेंद्र चित्राव…

वीरेंद्र चित्राव प्रास्ताविकात म्हणाले, आजच्या युवा पिढीवर चित्रपटांचे उत्तम संस्कार व्हावेत, त्यांची व्हिज्युअल लिटरसी वाढीस लागावी या हेतूने मुंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. आजही लघुपट-अनुभवपटांकडे मनोरंजनात्मक चित्रपटांचे सावत्र भावंड म्हणून पाहिले जाते. चित्रपटाला ज्या प्रमाणात आदर आणि ग्लॅमर मिळते तेवढे ग्लॅमर या क्षेत्राला मिळत नाही. ज्या प्रमाणे देशातील विविध भाषांमधील चित्रपटांना अनुदान दिले जाते, सन्मानित केले जाते त्या प्रमाणेच लघुपट-अनुभवपट निर्माण करणाऱ्या दिग्दर्शक, निर्मात्यांना प्रोत्साहित करण्यासाठी स्थानिक प्रशासन, केंद्र शासनाने आर्थिक पाठबळ देणे अत्यंत गरजेचे असून त्यासाठी संस्थांची उभारणी करावी.

 

किरण व्ही. शांताराम म्हणाले, मुंबा चित्रपट महोत्सव हा अतिशय उत्तम उपक्रम असून याच्या माध्यमातून नवीन पिढीला चित्रपट क्षेत्रातील अनेक बारकावे शिकावयास मिळतील. युवा पिढीने मनोरंजनात्मक चित्रपटाबरोबरच प्रबोधनात्मक, लघुपट, माहितीपट यांचाही अभ्यास करणे आवश्यक आहे.

प्रकाश मगदूम म्हणाले, मुंबा चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून जगभरातील उत्तमोत्तम चित्रपट, लघुपट, माहितीपट प्रेक्षकांसमोर आणले जात आहेत. या क्षेत्रात आलेल्या आणि येऊ इच्छिणाऱ्यांना महोत्सवातून प्रोत्साहन मिळेल तसेच सुजाण प्रेक्षक घडण्यास मदत होईल. ‘द पोर्ट्रेट ऑफ अ पायोनियर’ या लघुपटाचे डिजिटायझेशन व्ही. शांताराम यांच्या जयंतीपूर्वी पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

अभिषेक अवचार यांनी आभार मानले.

 

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती नको; खडकवासला काँग्रेसचे अध्यक्ष उमेश कोकरे यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आग्रही मागणी

गुलटेकडी येथील SRA प्रकल्पात पारदर्शकता आणून नागरिकांना न्याय द्या; सामाजिक कार्यकर्त्यांची ठाम भूमिका मीनाताई ठाकरे नगर (खड्डा) येथील नागरिकांच्या बैठकीत SRA योजनेतील त्रुटींवर तीव्र चर्चा एकाही झोपडीधारकावर अन्याय होऊ देणार नाही; सामाजिक कार्यकर्त्यांचा नागरिकांना पाठिंबा