संत विचारांचा परिणाम म्हणून मुले- मुली आंतरजातीय विवाह करु लागलीपरशुराम वाडेकर यांचे वक्तव्य; प्रकाश कर्डिले यांना संत जगनाडे महाराज पुरस्कार प्रदान
संत विचारांचा परिणाम म्हणून मुले- मुली आंतरजातीय विवाह करु लागली
परशुराम वाडेकर यांचे वक्तव्य; प्रकाश कर्डिले यांना संत जगनाडे महाराज पुरस्कार प्रदान
पुणे: व्यवस्थे विरुद्ध बंड पुकारणाऱ्या संतांचा विचार अजरामर झाल्याशिवाय राहत नाही. माणूस अमर नाही. कधीही मरण येऊ शकते. प्रेम हीच सर्वश्रेष्ठ भावना असते हे त्यांनी सांगितले. त्यामुळेच आज जातीपातीच्या बेड्या तुटायला सुरुवात झाली आहे. मुले- मुली आंतरजातीय विवाह करु लागली आहेत, असे वक्तव्य उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी काढले.
पूर्व भागातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कर्डिले यांना सामाजिक कार्याची पावती म्हणून संत जगनाडे महाराज पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. जगनाडे महाराज यांचा तुकाराम महाराज यांच्या टाळकऱ्यांत समावेश होता. त्यांनी नष्ट केल्या गेलेल्या तुकाराम गाथेचे फेरलेखन केले होते. प्रकाश कर्डिले जगनाडे महाराज यांच्या विचारांचा वारसा चालवत आहेत.
वाडेकर यांच्या हस्ते तुकोबांची पगडी, गौरव पत्र शाल देण्यात देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. छोट्या मोठ्या ८० संघटनांची शिखर संघटना असलेल्या शिव महोत्सव समितीने हा समारंभ आयोजित केला होता. नाना पेठेतील साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर मंडळात हा कार्यक्रम संपन्न झाला.
संयोजक रविंद्र माळवदकर,
साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर मंडळाचे कार्याध्यक्ष भाई कात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) युवा नेते अॅड. शिवराज माळवदकर, शाहू, फुले, आंबेडकर महोत्सव समितीचे विठ्ठल गायकवाड, अॅड. संजय कर्डिले, शिवराया पथारी संघटनेचे संजय निपानी, डॉ. मयूर कर्डिले, आकाश ताठे आदींसह नागरिक उपस्थित होते.
वाडेकर यांनी सांगितले की जाती व्यवस्थेचे चटके फक्त मीच नाही तर तुकोबा पासून अनेकांनी सहन केले. तुकाराम महाराज यांनी पीडित माणूस समोर ठेवून अभंग लिहिले, माणसाला न्याय मिळाला पाहिजे, अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या प्रत्येक अभंगात विद्रोह आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत १८ पगड मावळे होते. गावाच्या वेशीबाहेर जे होते त्यांना तलवार आणि स्वाभिमान देऊन त्यांनी उभे केले, सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले.
वाडेकर म्हणाले ''आयुष्य उध्वस्त करणारी व्यवस्था निर्माण केली गेली. आजपर्यंत ती व्यवस्था टिकून आहे. ज्यांनी याविरुद्ध बंडखोरी केली ते इतिहासाच्या पुस्तकात नाहीत. इथल्या बहुजन समाजाच्या विरोधातले धडे शिकवले गेले, पण आज सत्य पुढे येऊ लागले आहे.''
जाती धर्मांमध्ये सामाजिक समन्वय कायम ठेवला पाहिजे. त्यातच प्रगती असते. जिथे वाद होतात तेथे अधोगती निश्चित आहे, असे सांगून रविंद्र माळवदकर यांनी जगनाडे महाराज यांच्या अमूल्य कार्याची माहिती सांगितली तसेच कर्डिले यांच्या कार्याचा धावता परिचय करून दिला.
Comments
Post a Comment