पं. विनायकबुवा पटवर्धन स्मृती प्रतिष्ठान आयोजितनिरामय संगीत सोहळ्यात गायन, वादनाची रंगली मैफल
पं. विनायकबुवा पटवर्धन स्मृती प्रतिष्ठान आयोजित
निरामय संगीत सोहळ्यात गायन, वादनाची रंगली मैफल
पुणे : पं. विनायकबुवा पटवर्धन स्मृती प्रतिष्ठान आयोजित निरायम संगीत सोहळ्यात गायन, वादनाची मैफल रंगली. कलायन कल्चरल सेंटर, लॉ कॉलेज रस्ता येथे कार्यक्रम झाला.
डॉ. प्रकाश कुलकर्णी यांनी सादर केलेल्या ‘परम विमल तुझे स्मरण’ या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शिवानी दसककर यांनी गायन मैफलीची सुरुवात राग गौरीमधील पारंपरिक विलंबित तीन तालातील ‘ए बना तो पे वारू’ या बंदिशीने केली. त्याला जोडून आजोबा, गुरू पंडित राजाभाऊ देव यांनी बांधलेली द्रुत एक तालातील ‘विकल भाई सुध तन की’ ही रचना प्रभावीपणे ऐकविली. त्यानंतर गुरू व मातोश्री पंडिता अलका देव-मारुलकर यांनी सावनी नट रागात बांधलेली ‘झुलत सीर, मोर मुकुट’ ही रचना सादर करून दसककर यांनी मैफलीची सांगता केली.
या नंतर डॉ. नीलिमा राडकर यांनी व्हायोलीनच्या सुरावटींमधून ‘श्री’ रागाची सुमधुर आणि सविस्तर मांडणी केली.
विविध घराण्यांचे वैशिष्ट्य उलगडून दाखविताना डॉ. प्रकाश कुलकर्णी यांनी गायन मैफलीत रंग भरले. सुरुवातीस ग्वाल्हेर घराण्याचा बडा ख्याल सादर करताना त्यांनी ‘देवी भजो दुर्गा भवानी, जगत जननी’ ही रचना ऐकविली. त्यानंतर मैहर घराण्याचे वैशिष्ट्य दर्शविताना ‘जीवन मे मम प्राणसखा रे’ ही रचना सादर केली. ‘अत सोहत चंद्र भजत मुख नयन’ ही रचना ऐकवून डॉ. कुलकर्णी यांनी भेंडी बजार घराण्याच्या गायकीची मांडणी केली. ग्वाल्हेर घराण्यातील ‘तन देरे न देरे देरे तदानी तदानी’ हा तराणा प्रभावीपणे सादर केला.
कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात पंडित जयंत केजकर यांची गायन मैफल रंगली. त्यांनी राग छायानट मधील ‘नीवर की झनकार’ ही बंदिश सादर करून त्याला जोडून द्रुत लयीतील ‘झनन झनन बाजे बिछुआ’ ही रचना ऐकवून रसिकांना मोहित केले.
कलाकारांना लीलाधर चक्रदेव (संवादिनी), अभिजीत जायदे, श्रीपाद शिरवळकर, अभिजीत बारटक्के (तबला) तर शिवानी लाड, कीर्ती धर्माधिकारी, विनय कोहाड, कन्हैया भोसले (तानपुरा, सहगायन) यांनी समर्पक साथसंगत केली.
नीलिमा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.
Comments
Post a Comment