*स.प.महाविद्यालयात बीए (सिव्हिल सर्व्हिस) पदवी अभ्यासक्रम* *शिक्षण प्रसारक मंडळीच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या १०९ व्या वर्धापन दिनानिमित्त घोषणा



पुणे: शिक्षण प्रसारक मंडळीच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या १०९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ‘बीए,(सिव्हिल सर्व्हिस)’ या चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाची घोषणा करण्यात आली.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत सर परशुरामभाऊ महाविद्यालयात घेण्यात येणारा हा महाराष्ट्र राज्यातील पहिला वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम आहे.

पत्रकार परिषदेत शिक्षण प्रसारक मंडळी नियामक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.एस.के.जैन यांनी संस्थेचा इतिहास सांगितला. स.प. महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष केशव वझे, सदस्य पराग ठाकूर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ. सुनिल गायकवाड, प्रा.डॉ.संज्योत आपटे, प्रा. डॉ. डी.बी. पवार यांनी अभ्यासक्रमाची माहिती दिली. परिषदेत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. धनंजय दिवटे, डॉ. विद्या अवचट उपस्थित होते.

सर परशुरामभाऊ महाविद्यालय आणि माजी पोलीस महासंचालक डॉ.जयंत उमराणीकर यांच्या ‘उमराणीकर व्ह्यू एज्युकेटर्स’ या संस्थेच्या सहकार्यातून आयोजित हा अभ्यासक्रम जुलैमध्ये सुरू होत आहे. या अभ्यासक्रमाची रचना स्वतः डॉ.जयंत उमराणीकर यांनी केली आहे. ’नागरी व संरक्षण सेवांमध्ये कार्य करण्यास इच्छुक असणा-यांसाठी व यांतील स्पर्धा परीक्षांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे. राष्ट्रबांधणीकरता उपयुक्त असा हा अभ्यासक्रम विद्यार्थी, पालक, प्राचार्य व अभ्यासक यांच्या आग्रहातून तयार केला आहे.

महाराष्ट्र शासन, विविध एनजीओ यांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमातील इंटर्नशिप करता येईल.त्यातून त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्राप्त होईल. त्यांच्यामध्ये नेतृत्व गुणांचा विकास होईल ज्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील अनेक सेवासांठी आवश्यक गुण त्यांच्यात निर्माण होतील.’असे डॉ.उमराणीकर म्हणाले.

यासोबत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत महाविद्यालयात भाषा विभागांतर्फे सोप्या पद्धतीने भाषा व लिपींची मूलभूत ओळख होण्यासाठी ‘प्रमाणपत्र वर्ग व लघुकालिक वर्गां’चेही आयोजन करण्यात आले आहे. मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्लिश व जर्मन भाषांतील या वर्गांची माहिती महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे ; असे सांगण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात 22 यार्डस संघाचे वर्चस्व

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय !*- मोनिका मोहोळ यांचा पहिल्या दिवसापासूनच सहभाग- ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण

नॉक-९९ करंडक’ १२ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धाकोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, जस क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी सलामी !!