महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत पीबीजी कोल्हापूर टस्कर्सचा ईगल नाशिक टायटन्सवर विक्रमी विजयअंकित बावणे(नाबाद ९४), योगेश डोंगरे(नाबाद ५९), राहुल त्रिपाठी(४६)संघाच्या विजयाचे शिल्पकार पीबीजी कोल्हापूर टस्कर्सची गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप

पुणे, १३ जून २०२४: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत तेराव्या दिवशी पहिल्या लढतीत पुनीत बालन ग्रुप कोल्हापूर टस्कर्स संघाने ईगल नाशिक टायटन्स संघाचा ६ गडी राखून पराभव करत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. झंझावती खेळी करणारे अंकित बावणे(नाबाद ९४), योगेश डोंगरे(नाबाद ५९), राहुल त्रिपाठी(४६) हे संघाच्या विजयाचे हिरो ठरले. विक्रमी २२२धावांचे आव्हान पूर्ण करून पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने एमपीएलमधील नव्या विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली. 

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५बाद २२२धावांचा डोंगर उभा केला. विशेष म्हणजे एमपीएलमधील हि विक्रमी धावसंख्या ठरली. याआधी गतवर्षी ईगल नाशिक टायटन्स संघाने पुणेरी बाप्पा संघाविरुद्ध २०३ धावांचे लक्ष्य पूर्ण केले होते. अर्शिन कुलकर्णी व मंदार भंडारी या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ३४चेंडूत ४२धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. मंदार भंडारी १७धावांवर श्रेयस चव्हाणच्या गोलंदाजीवर झेल बाद झाला. अर्शिन कुलकर्णीने साहिल पारखच्या समवेत दुसऱ्या विकेटसाठी ३६चेंडूत ६०धावांची भागीदारी करून संघाच्या डावाला आकार दिला. साहिल पारखने २१चेंडूत ४०धावांची आक्रमक खेळी केली. त्यात त्याने ३चौकार व ३ षटकार मारले. आक्रमक फटकेबाजीच्या प्रयत्नात साहिल पारख ४०धावांवर योगेश डोंगरेच्या गोलंदाजीवर झेल बाद झाला. 

अर्शिनने एकाबाजूने आक्रमक खेळी करत ५७चेंडूत नाबाद ९७धावांची धडाकेबाज कामगिरी केली. अर्शिनने ७चौकार व ७षटकारांची आतषबाजी केली. त्यानंतर अर्शिनने अथर्व काळेच्या साथीत चौथ्या विकेटसाठी २७ चेंडूत ५९ धावाची भागीदारी करून संघाला २२२धावांचे आव्हान उभे केले. कोल्हापूर टस्कर्सकडून श्रेयस चव्हाण(२-२९)याने दोन गडी, योगेश डोंगरे(१-१४)ने एक गडी बाद केला. २२२धावांचे आव्हान पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने १९षटकात ४बाद २२६धावा करून पूर्ण करत नवा विक्रम नोंदवला. सलामवीर अंकित बावणेने अफलातून फलंदाजी करताना ४८चेंडूत नाबाद ९४धावांची खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने १०चौकार व ६ उत्तुंग षटकार ठोकत मैदान दणाणून सोडले. अंकित व राहुल त्रिपाठी या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ४०चेंडूत ८३धावांची भागीदारी करून संघाचा पाया भक्कम केला. कर्णधार राहुल त्रिपाठीने सुरेख खेळी करताना २०चेंडूत ४६धावा काढून अंकितला साथ दिली. त्यात राहुलने ५चौकार व ३ शानदार षटकार ठोकले. प्रशांत सोळंकीने राहुल त्रिपाठीला पायचीत बाद केले. त्यानंतर सचिन धस(५), सिद्धार्थ म्हात्रे(५) हे झटपट बाद झाल्यावर यावेळी कोल्हापूर टस्कर्सला विजयासाठी ५९ चेंडूत ११३धावा असे समीकरण होते. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या योगेश डोंगरेने २४चेंडूत नाबाद ५९धावांची झंझावती खेळी केली. योगेशने ५चौकार व ५षटकाराची तुफानी खेळी केली. या जोडीने पाचव्या विकेटसाठी ४२चेंडूत १०१ धावांची भागीदारी करून संघाचा विजय सुकर केला. 

संक्षिप्त धावफलक
ईगल नाशिक टायटन्स: २०षटकात ५बाद २२२धावा(अर्शिन कुलकर्णी नाबाद ९७(५७,७x४,७x६), अथर्व काळे ४५(१९,५x४,३x६), साहिल पारख ४०(२१,३x४,३x६), मंदार भंडारी १७, श्रेयस चव्हाण २-२९, योगेश डोंगरे १-१४) पराभुत वि.पुनीत बालन ग्रुप कोल्हापूर टस्कर्स: १९षटकात ४बाद २२६धावा(अंकित बावणे नाबाद ९४(४८,१०x४,६x६), योगेश डोंगरे नाबाद ५९(२४,५x४,५x६), राहुल त्रिपाठी ४६(२०,५x४,३x६), अक्षय वाईकर १-३३, प्रशांत सोळंकी १-३६, अर्शिन कुलकर्णी १-३७); सामनावीर - अंकित बावणे.       

Comments

Popular posts from this blog

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात 22 यार्डस संघाचे वर्चस्व

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय !*- मोनिका मोहोळ यांचा पहिल्या दिवसापासूनच सहभाग- ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण

नॉक-९९ करंडक’ १२ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धाकोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, जस क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी सलामी !!