विद्यार्थ्याच्या व्यक्तीमत्त्व विकास आणि सृजनतेला वाव : डॉ. नितीन करमाळकरनेक्स्ट जेन करिअर फेस्ट प्रदर्शनानिमित्त राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विषयावर चर्चासत्र

पुणे : तात्विक विचार करण्याची प्रगल्भता विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच येते. शालेय विद्यार्थ्यांपासून ते उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास, त्यांच्या सृजनशीलतेला वाव देणे या मुद्द्यांचा अंतर्भाव नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात करण्यात आलेला आहे. व्यक्ती, समाज आणि निसर्ग याला अनुलक्षून नवे शैक्षणिक धोरण आहे, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु व शिक्षण धोरण सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमाळकर यांनी दिली.

अस्पायर नॉलेज ॲन्ड स्किल्स, संवाद पुणे आणि हाऊस ऑफ सक्सेसतर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे मॅनेजमेंट असोसिएशन, भावार्थ यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या नेक्स्ट जेन करिअर फेस्ट प्रदर्शनातील दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात ‌‘करियर आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण‌’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी डॉ. करमाळकर बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रीसर्च पार्क फाऊंडेशनचे सीइओ डॉ. अरविंद शाळीग्राम, शिरूरच्या सी. टी. बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते, अस्पायर नॉलेज ॲन्ड स्किल्सचे अध्यक्ष डॉ. संजय गांधी, अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे एकल महाराष्ट्र तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुनील भिरुड, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे डॉ. मिलिंद वाकोडे यांचा सहभाग होता. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी होत्या.
‌‘एआय युगात..! चला, करियर घडवू‌’ या विषयावर भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाची सुरुवातीस मान्यवरांना पाहणी केली. प्रदर्शनाविषयीची माहिती प्रसाद मिरासदार यांनी दिली. 
कृत्रिम बुद्धिमत्ता याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणावर होत असली तरी कृत्रिम बुद्धिमत्तेचा धोका नाही, असे नमूद करून डॉ. नितीन करमाळकर पुढे म्हणाले, नव्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्यातील कलागुण विकसित करण्यास वाव मिळणार आहे. शिक्षण घेताना त्याला ज्या गोष्टी रुचतील, आवडतील त्या गोष्टींचे शिक्षण घेऊन विद्यार्थ्याने पारंगत व्हावे अशी संकल्पना या नव्या शैक्षणिक धोरणात आहे. 
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, आपल्याला आपल्यातील भारतीयत्व टिकवून, आपल्यामधील अस्मिता जागृत करून, नव्या-जुन्या ज्ञानाचे एकत्रिकरण करून स्वत:ला पुढे न्यायचे आहे. या दृष्टीने मार्गदर्शन करणारे नवे शैक्षणिक धोरण आहे. दहावी-बारावी नंतर किवा पदवी नंतर व्यावसायिक शिक्षण असा पूर्वी विचार व्हायचा. पण आता शाळास्तरापासूनच याचा विचार करण्यात आला आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार मिळणारे शिक्षण जीवनाभीमुख आहे, मातृभाषेला आलेले महत्त्व आणि भारतीय ज्ञान व्यवस्था या तिघांची सांगड यात घालण्यात आली आहे.
डॉ. सुनील भिरुड म्हणाले, नव्या धोरणानुसार शिक्षण पद्धतीत भारतीयत्व आणण्याचा प्रयत्न आहे. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना विद्या शाखांची जी बंधने होती ती आता दूर होणार आहेत. कौशल्याधारीत शिक्षण असल्याने विद्यार्थ्यांना करिअरच्या संधीही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत. मुख्यत्वेकरून कलागुण विकसित करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
नव्या शैक्षणिक धोरणाबाबत असलेल्या शंकांचे निरसन व्हावे, अशी अपेक्षा डॉ. संजय गांधी यांनी व्यक्त केली.
नव्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी विचार होत आहेत, असे नमूद करून डॉ. के. सी. मोहिते म्हणाले, सर्व घटकातील विद्यार्थ्यांना आवडीचे शिक्षण घेता येणार आहे. विद्यार्थ्याचा सर्वांगिण विकास होण्याच्या दृष्टीने धोरणात विचार केला गेला आहे.
डॉ. मिलिंद वाकोडे म्हणाले, नव्या शैक्षणिक धोरणाशी ग्रामोद्योग जोडला गेल्यास तरुणांना व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होतील. रोजगार निर्मिती होईल आणि शहराकडे येणारे लोंढे थांबतील. मधुमाक्षिकापालन या व्यवसायासंदर्भात त्यांनी माहिती दिली.
मान्यवरांचे स्वागत डॉ. संजय गांधी, सुनील महाजन, प्रसाद मिरासदार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती जोशी यांनी केले.


Comments

Popular posts from this blog

पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात 22 यार्डस संघाचे वर्चस्व

नॉक-९९ करंडक’ १२ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धाकोद्रे फार्म्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, जस क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी सलामी !!

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय !*- मोनिका मोहोळ यांचा पहिल्या दिवसापासूनच सहभाग- ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण