गोमाता चारा खा... पाणी पी आणि सुखी रहा' उपक्रमांतर्गत १०० गोशाळांना चारा वाटप*पुण्यातील महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने उपक्रम
पुणे : 'गोमाता चारा खा.. पाणी पी आणि सुखी रहा' हा आगळा-वेगळा उपक्रम महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने सुरु करण्यात आला. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील शंभर गोशाळांना चारा वाटप करण्यात आला. वाढत्या उन्हाच्या झळा गोमातेला देखील सोसाव्या लागत होत्या. अनेक ठिकाणी दुष्काळामुळे गोमातेला चारा - पाणी मिळत नव्हते, यासाठी फेडरेशनच्या वतीने हे अभियान राबविण्यात आले.
महा एनजी फेडरेशनच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमासाठी ठाण्याचे सी.एल राठी आणि त्यांच्या परिवाराने मोठे योगदान दिले असून महाराष्ट्रातील अनेकांची मदत उपक्रमाला लाभली असल्याची माहिती फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली. या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील श्री बोरमलनाथ गोशाळा ट्रस्ट येथे सुमारे ४५० हून अधिक खिलार,थारपार,गीर जातीचे गोवंश आहेत. या गोशाळेतील गोवंशांना दररोज सुमारे ६ टन चारा लागतो, ज्याचा दर दिवसाचा खर्च सुमारे १० हजार आहे. लीला मणियार यांनी गाईंसाठी ५० हजार रुपयांचा चारा उपलब्ध करून देत या उपक्रमाला प्रारंभ झाला होता.
शेखर मुंदडा म्हणाले, उन्हाळ्यात महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण होते. त्यामुळे गोमातेला चारा आणि पाणी देखील मिळत नाही. यासाठी 'गोमाता चारा खा... पाणी पी आणि सुखी रहा' या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमांतर्गत शंभर गो शाळांना मदत करण्यात आली. पावसाळ्यात देखील गोशाळांपर्यंत चारा पोहचण्यास वेळ लागतो त्यामुळे हा उपक्रम पुढेही चालत राहिल, असेही त्यांनी सांगितले.
Comments
Post a Comment