वारी' बंधुता आणि मानवतेचे महासंमेलन



'वारी' बंधुता आणि मानवतेचे महासंमेलन


जगाला लुभावणारी पंढरपुरातील विठुरायाची आषाढी वारी ही मानवी शुद्धतेचे सर्वात मोठे माध्यम आहे. पंढरीच्या विठुरायाच्या वारीची परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली आहे. आजपर्यंत समस्तजनांनी, वैष्णवांनी पंढरपूरची पायी वारी केली आहे. पुंडलिकाच्या भक्तीला महत्व देऊन भगवान विठ्ठल आजही विटेवरी उभे आहेत. अशा आख्यायिका आपण ऐकल्या असतील. म्हणजेच शुद्ध भक्तिभाव भगवतांना प्रिय आहे. म्हणूनच विठ्ठल हा सर्व भाविक वैष्णवांचा भगवंत आहे. आजपर्यंत संतांनी मानवाच्या कल्याणासाठी, सलोख्यासाठी आणि विश्वशांतीसाठी मानवतेचा मार्ग सांगितला आहे. आज जगाचा विनाश करू पाहणाऱ्या युद्धाच्या काळात विश्वबंधुता आणि विश्वशांतीसाठी सर्व देशांनी जागतिक स्तरावर एकत्र येणे आवश्यक झाले आहे. अशा वेळी जगाच्या पाठीवर लाखो लोकांना एकत्र जोडणारी ही पंढरीची वारी असल्याने, या वारीला आपण बंधुता आणि मानवतेचे महासंमेलन संबोधू शकतो.

माणसे थोडीफार जास्त शिकली की ती अहंकारी होण्याची शक्यता अधिक असते. ज्ञान लोकांना अहंकारी बनवत नाही. पण ज्ञानामुळे आलेला कथित मोठेपणा हा मानवाला अहंकार देऊन जातो. अहंकार माणसाला शेवटी विनाशाकडे घेऊन जाणारा असतो. विठुरायाच्या वारीमध्ये मात्र सर्व वैष्णव गोपाळ ज्ञान, अज्ञान, मोठेपणा, अहंकार सर्व बाजूला ठेऊन केवळ शुध्द भक्तिभावाने वारकरी म्हणून आलेले असतात.

        जे का रंजले गांजले |
       त्याशी म्हणे जो आपुले ||
       तोचि साधू ओळखावा |
       देव तेथेची जाणावा ||

रंजल्या गांजल्यांना आपलंसं करून त्यांचा पालनहार करणारा हा विठोबा सामाजिक न्यायाचे खरे प्रतिक आहे. वारी भेदभाव करत नाही. माणसातील भेद - खेद समूळ नष्ट व्हावा, याचा विचार आणि आचार वारी देत राहते. वारी माणसा माणसांना जोडणारा मानवतेचा दुवा प्रवाहित करते. आज भारतीय संत साहित्याचा अगाध महिमा आणि विश्वात्मके पसायदानाची ही संस्कृती केवळ पंढरीच्या याच ज्ञानवारीमुळे टिकून राहिली आहे. पायी चालत देवाला भेटायला जाताना सर्वजण एकमेकांना बंधूभावाची वागणूक देतात. या वारीमध्ये प्रत्येक वारकरी हा एकमेकांसाठी भगवंत म्हणजेच माऊली झालेला असतो. 

       या रे या लहान थोर |
       याती भलते नारी नर ||

ही समतेची दिंडी असते. लहान - थोर, नारी - नर असा कोणताच भेदभाव न करता सर्वजन हरिनामाचा गजर करता वारीच्या रिंगणात समता दर्शवतात.

अशा प्रकारे समता, समानता, बंधुता, आदर, स्नेह, प्रेम, भक्तिभाव, सामाजिक ऐक्य, एकात्मता आणि सलोख्यासाठी आवश्यक असणाऱ्या मानवी मूल्यांचे दर्शन याच पंढरीच्या वारीत होते. एकमेकांच्या चरणांचे दर्शन घेऊन या वारीमध्ये मानवी आदर आणि उदारता जगायला मिळते. म्हणूनच विश्वशांतीसाठी आवश्यक असणारा मानवतेचा एकमेव महामार्ग म्हणजेच पंढरीची वारी होय.


       - विक्रम मालन आप्पासो शिंदे
            कवी, लेखक, साहित्यिक
                 7743884307

Comments