रखरखत्या भोवतालाने आपल्यातील हळवेपण हिरावून घेतले-नाना पाटेकर, ज्येष्ठ अभिनेते


रखरखत्या भोवतालाने आपल्यातील हळवेपण हिरावून घेतले
-नाना पाटेकर, ज्येष्ठ अभिनेते
पुणे:- गेल्या काही वर्षांपासून मी निसर्गाच्या सान्निध्यात राहतो आहे. त्यामुळे आता मला शहरातील माणसे, टोलेजंग इमारती आणि मोठाल्या गाड्यांची भिती वाटू लागली आहे. या रखरखत्या भोवतालाने आपल्यातील हळवेपण हिरावून घेतले आहे, ही जाणीव वेदना देणारी आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले. 
विदिशा विचार मंच आणि कोहिनूर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने कोहिनूर ग्रुपच्या सहकार्याने ज्येष्ठ लेखक अनंत सामंत लिखित आणि रोहन प्रकाशनातर्फे प्रकाशित 'ही चंद्रचुऱ्याची नक्षी' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि अभिवाचन कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी प्रमुख अतिथी नाना पाटेकर बोलत होते. या कार्यक्रमाची निर्मिती आणि संकल्पना विदिशा विचार मंचचे समन्वयक पंकज क्षेमकल्याणी यांची होती.
कर्वे रस्त्यावरील स्वा. सावरकर अध्यासन केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, प्रसिध्द कवी संदीप खरे, प्रसिध्द अभिनेत्री नेहा जोशी, विदिशा विचार मंचच्या संस्थापक-संचालक ममता क्षेमकल्याणी आणि समन्वयक पंकज क्षेमकल्याणी उपस्थित होते. 
यावेळी बोलताना नाना पाटेकर म्हणाले की, अनंत सामंत हे वाचकाला झपाटून टाकणारे लेखक आहेत. त्यांच्या लेखनात पहायला मिळणारी निसर्गाची रूपे आपल्या कल्पनाशक्तीच्याही पलीकडची आहेत. अनंत सामंत यांनी 'ही चंद्रचुऱ्याची नक्षी' या पुस्तकात अनेक वैयक्तिक अनुभव लिहिले आहेत. ही त्यांच्या लेखनाची जमेची बाजू असून त्यांनी कायम लिहिते राहिले पाहिजे. 
यावेळी बोलताना संदीप खरे म्हणाले की, अनंत सामंत यांनी या पुस्तकामध्ये खूप वैयक्तिक लेखन केले असले, तरी त्याला वैश्वितकेचा गाभा आहे. त्यांच्या लेखनात असलेली संवेदनशीलता त्यांच्या वास्तव जीवनाला देखील समृध्द करणारी आहे.
यावेळी बोलताना कृष्णकुमार गोयल म्हणाले की, एखाद्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा त्या पुस्तकाच्या अभिवाचनाने करावा, ही फारच चांगली कल्पना आहे. पुस्तक हे एक सशक्त माध्यम आहे, हे अनंत सामंत यांच्यासारख्या ताकदीने लिहिणाऱ्या लेखकांमुळे पुन्हा पुन्हा सिध्द होते. त्यांचे "एम टी आयवा मारू" हे पुस्तक आज सुमारे ३७ वर्षे झाली तरीही वाचकांच्या हिट लिस्टवर आहे. 'ही चंद्रचुऱ्याची नक्षी' हे त्यांचे नवीन पुस्तक देखील वाचकांना आवडेल, असा मला विश्वास वाटतो. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन विदिशा विचार मंचच्या संस्थापक-संचालक ममता क्षेमकल्याणी यांनी केले. विदिशा विचार मंचचे समन्वयक नितीन जळूकर यांनी आभार मानले. 
यावेळी 'ही चंद्रचुऱ्याची नक्षी' या पुस्तकातील निवडक भागांचे अभिवाचन प्रसिद्ध कवी संदीप खरे आणि प्रसिद्ध अभिनेत्री नेहा जोशी यांनी केले. सर्वांसाठी विनामूल्य खुल्या असलेल्या या कार्यक्रमास रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 


Comments