कलाकारांनी कायम शिकत राहणे आणि स्वतःला अपडेट ठेवणे आवश्यक - दिग्दर्शक मधुर भांडारकर*
*कलाकारांनी कायम शिकत राहणे आणि स्वतःला अपडेट ठेवणे आवश्यक - दिग्दर्शक मधुर भांडारकर*
*अभिनय कार्यशाळा व फिल्म इंडस्ट्री समिट २०२६ उत्साहात पार; चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी दिले यशाचे मंत्र*
*दिग्दर्शक मधुर भांडारकर, मृणाल कुलकर्णी, राहुल सोलापूरकर यांच्यासह मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन; नवोदित कलाकारांना मिळाली प्रेरणा*
पुणे : दादासाहेब फाळके फिल्म इन्स्टिट्यूटच्या वतीने गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे येथे आयोजित करण्यात आलेली "अभिनय कार्यशाळा व फिल्म इंडस्ट्री समिट – २०२६" उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. राज्यभरातून मोठ्या संख्येने नवोदित कलाकार, अभिनयप्रेमी आणि चित्रपट क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी या समिटला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजन, दीपप्रज्वलन आणि मान्यवरांच्या स्वागताने झाली. यावेळी पद्मश्री आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर, दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पूसाळकर, दादासाहेब फाळके फिल्म इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष राजाराम कोरे,
साऊथ स्टार अभिनेता रवी प्रकाश, प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर विकी सिदाना, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेते राहुल सोलापूरकर, व्हॉईस ओव्हर कलाकार केदार आठवले, सुनील महाजन, रमेश परदेशी, बाबासाहेब पाटील, राज काझी, "मामाच्या गोव्याला जावूया" चित्रपटातील कलाकार कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजीत चव्हाण आणि दिग्दर्शक विजू माने उपस्थित होते.
भांडारकर म्हणाले, "आजचा सिनेमा सतत बदलत आहे आणि प्रत्येक पाच वर्षांनी चित्रपटसृष्टीत नवे ट्रेंड येत असतात. त्यामुळे दिग्दर्शक आणि कलाकारांनी कायम शिकत राहणे आणि स्वतःला अपडेट ठेवणे आवश्यक आहे. आजच्या डिजिटल युगात प्रेक्षक अधिक जागरूक झाले आहेत. पूर्वी वर्तमानपत्रांवर अवलंबून असलेली माहिती आता क्षणार्धात मोबाईलवर उपलब्ध होते. प्रेक्षकांच्या बदलत्या अपेक्षा लक्षात घेऊनच आम्ही कथा आणि पात्रांवर अधिक मेहनत घेतो. मला माध्यमे, प्रेक्षक आणि चित्रपटप्रेमींनी दिलेल्या प्रेम व पाठिंब्यामुळेच माझे चित्रपट यशस्वी ठरले आहेत."
समिटमध्ये चित्रपटसृष्टीतील संधी, अभिनयातील व्यावसायिक शिस्त, कलाकाराचा प्रवास, ऑडिशन प्रक्रिया, पोर्टफोलिओ, लूक टेस्ट, सेल्फ टेस्ट, संवादकौशल्य, कॅमेऱ्यासमोरील आत्मविश्वास, चित्रपट निर्मिती प्रक्रिया, कलाकार निवड, शूटिंगचा अनुभव आणि फिल्म प्रमोशन यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्यक्ष ऑडिशन डेमो, सीन परफॉर्मन्स आणि सहभागी कलाकारांना तज्ज्ञांकडून थेट फीडबॅक देण्यात आला.
चित्रपट आणि अभिनय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या नवोदितांसाठी हा समिट अत्यंत मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता विजय आंदळकर आणि अभिनेत्री समीरा गुजर यांनी केले. तर आभार राजाराम कोरे यांनी मानले.
Comments
Post a Comment