कलामहर्षी डी. एस. खटावकर पथ फलकाचे अनावरण*ज्येष्ठ मूर्तिशास्त्र अभ्यासक डॉ.गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते उद्घाटन
*कलामहर्षी डी. एस. खटावकर पथ फलकाचे अनावरण*
ज्येष्ठ मूर्तिशास्त्र अभ्यासक डॉ.गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे : नगरसेविका स्वप्नाली नितीन पंडित यांच्या निधीतून साकारण्यात आलेल्या 'कलामहर्षी डी. एस. खटावकर पथ' फलकाचे अनावरण तुळशीबाग रस्ता, गणपती चौक येथे उत्साहात पार पडले.
याचे उद्घाटन ज्येष्ठ मूर्तिशास्त्र अभ्यासक डॉ.गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार हेमंत रासने यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासोबत नगरसेवक राघवेंद्र मानकर, कुणाल टिळक, स्वरदा बापट, उदय लेले, माजी नगरसेवक राजेश येनपुरे, आयोजक नगरसेविका स्वप्नाली पंडित, विवेक खटावकर, नितीन पंडित, विकास पवार, राजेंद्र धावडे, विनायक कदम, दत्ताभाऊ कावरे, मोहन साखरिया, सागर दहीभाते, अरविंद तांदळे, जीवन हेंद्रे, किरण चौहान आदी मान्यवर उपस्थित होते.
डी.एस. खटावकर यांचे नाव पुण्याच्या गणेशोत्सवाशी अविभाज्यपणे जोडले गेले आहे. विशेषतः तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी त्यांनी सलग ५५ वर्षे मूर्तिकार आणि सजावटकार म्हणून काम केले. मानाच्या गणपतींसह हत्ती गणपती, अखिल मंडई मंडळ आणि भाऊ रंगारी गणपती यांसारख्या मोठ्या मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीतील भव्य चित्ररथ हे त्यांच्या कलेचे जिवंत नमुने होते.
नगरसेविका स्वप्नाली पंडित म्हणाल्या, पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आणि कला क्षेत्राला आपल्या कल्पकतेने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे ज्येष्ठ शिल्पकार व चित्रकार दत्तात्रेय श्रीधर उर्फ डी. एस. खटावकर यांचा जीवनप्रवास आजही नव्या पिढीच्या कलाकारांसाठी दीपस्तंभ ठरत आहे.
'कला महर्षी' ही पदवी सार्थ करणाऱ्या खटावकर सरांनी आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीत केवळ मातीच्या मूर्तीच घडवल्या नाहीत, तर कलेच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती घराघरांत पोहोचवली. अशा थोर व्यक्तिमत्त्वाच्या स्मरणार्थ या पथाला त्यांचे नाव देणे हा आमच्यासाठी अभिमानाचा आणि सन्मानाचा क्षण आहे.
Comments
Post a Comment