विदुषी शैला दातार यांची रंगली गायन मैफल
विदुषी शैला दातार यांची रंगली गायन मैफल
पुणे : डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन संचलित स्वरमयी गुरुकुलतर्फे बैठक या उपक्रमाअंतर्गत पद्मश्री विदुषी माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या ज्येष्ठ शिष्या विदुषी शैला दातार यांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायन मैफलीचे आज स्वरयमी गुरुकुल येथे आयोजन करण्यात आले होते.
राग शिवमत भैरवमधील ‘सभा रंग जोग भई राजा राम’ या बंदिशीसह ‘का ऐसी भूल भई मोसे’ ही पारंपरिक बंदिश सादर करण्यात आली. आध्यात्मिक अनुभूती देणाऱ्या स्वरांनी सभागृह भारावून गेले. धीरगंभीर अन् अंतर्मुख करणारे स्वर थेट हृदयाच्या तारा छेडत होते. प्रत्येक समेवर जाणकार श्रोत्यांकडून आपसुकच दाद दिली जात होती. मंत्रमुग्ध करणाऱ्या या मैफलीत आलापीमधील लय आणि अनुभवी ठेहराव रसिकांची वाहवा मिळवत होते, तर ताना थेट काळजात हात घालत होत्या.
प्रभाताई आणि माणिकबाई या सुरेशबाबू माने यांच्याकडे शिकत होत्या. माणिकबाई जुन्या वळणाच्या, प्रभाताई बुद्धिमान विचार करत गात, अशी आठवण सांगत दातार यांनी मिश्र काफी रागातील ‘पिया तो मानत नाही’ ही ठुमरी पेश केली.
‘जमुना के तीर होरी रचुंगी कान्हा’ ही बंदिश सादर करून ‘दिल बहार’ या भैरवीतील टप्प्याने मैफलीचा समारोप केला. त्यांना उल्हास कुलकर्णी (तबला), डॉ. केशवचैतन्य कुंटे (संवादिनी), सावनी दातार, रसिका चिंधडे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
प्रभा अत्रे यांच्या ज्येष्ठ शिष्या अश्विनी मोडक यांनी कलाकारांचा सत्कार केला तर निर्मला थोरात यांनी निवेदन केले.
Comments
Post a Comment