बदल घडविण्यासाठी शिक्षणपद्धती प्रयोगशील असणे गरजेचे*अॅड अभय आपटे यांचे मत : विद्या महामंडळ संस्थेच्या ६४ व्या वर्धापनदिनी व 'लोकशिक्षण दिनानिमित्त पु. ग. वैद्य स्मृती पुरस्कार' प्रदान सोहळा संपन्न
*बदल घडविण्यासाठी शिक्षणपद्धती प्रयोगशील असणे गरजेचे*
अॅड अभय आपटे यांचे मत : विद्या महामंडळ संस्थेच्या ६४ व्या वर्धापनदिनी व 'लोकशिक्षण दिनानिमित्त पु. ग. वैद्य स्मृती पुरस्कार' प्रदान सोहळा संपन्न
पुणे : आपल्या शिक्षणपद्धतीत आजही स्वतंत्र विचार करायला प्रवृत्त करणारी, व्यवसायिक दृष्टिकोन विकसित करणारी आणि नवीन कल्पनांना वाव देणारी दृष्टी नाही. आपण अजूनही फक्त पाट्या टाकणारी माणसं तयार करतो. नवीन शैक्षणिक धोरणे आली असली तरी ती बहुतांश कागदोपत्रीच राहिली आहेत. यात खरा बदल घडवायचा असेल तर शिक्षणपद्धती प्रयोगशील असणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन प्रयोग करण्यास संधी दिली पाहिजे, असे मत अॅड. अभय आपटे यांनी व्यक्त केले.
विद्या महामंडळ संस्थेच्या ६४ व्या वर्धापनदिनी व 'लोकशिक्षण दिनानिमित्त 'पु. ग. वैद्य स्मृती पुरस्कार' प्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी आपटे प्रशालेच्या माजी विद्यार्थी बांधकाम व्यावसायिक तुषार केवटे यांना अॅड अभय आपटे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आपटे रस्त्यावरील संस्थेच्या सभागृहात सोहळा संपन्न झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राम रानडे, कार्याध्यक्ष अमोल साने, कार्यवाह लिलाधर गाजरे आदी मान्यवर उपस्थित होते. मानचिन्ह, पुष्पगुच्छ, अकरा हजार रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते.
पुरस्काराला उत्तर देताना तुषार केवटे म्हणाले, “ज्या शाळेत वाढलो, त्या शाळेकडून मिळणारा सन्मान हा सर्वात बहुमोलाचा असतो. मी शाळेत आल्यावर एक वाक्य पाहिले होते ‘मी नोकरी घेणारा नव्हे, तर देणारा होणार’. त्याचा खरा अर्थ मला इथे आल्यावर कळला. शिक्षकांनी मला केवळ पुस्तकी ज्ञान न देता व्यवसाय उभारणीची दृष्टी, स्पर्धेत टिकून राहण्याची तयारी आणि संकटाचे संधीमध्ये रूपांतर कसे करायचे याचे मौल्यवान धडे दिले. हीच शिकवण माझ्या प्रवासाची सर्वांत मोठी ताकद ठरली, असे त्यांनी नमूद केले.
सुमेधा जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. लिलाधर गाजरे यांनी प्रास्ताविक केले आणि प्रा. गौतम मगरे यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment