आत्ममग्नतेमुळे संस्थात्मक कार्याची हानी : प्रा मिलिंद जोशी.संस्थेची संस्थाने झाली की चळवळ संपते : प्रा. मिलिंद जोशीरंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे साहित्यप्रेमी भगिनी मंडळाला आदर्श संयोजक पुरस्कार प्रदानसाहित्यप्रेमी भगिनी मंडळ संस्थात्मक कार्याचा वस्तूपाठ : प्रा. मिलिंद जोशी

आत्ममग्नतेमुळे संस्थात्मक कार्याची हानी : प्रा मिलिंद जोशी.
संस्थेची संस्थाने झाली की चळवळ संपते : प्रा. मिलिंद जोशी
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे साहित्यप्रेमी भगिनी मंडळाला आदर्श संयोजक पुरस्कार प्रदान
साहित्यप्रेमी भगिनी मंडळ संस्थात्मक कार्याचा वस्तूपाठ : प्रा. मिलिंद जोशी
पुणे : सरकारी यंत्रणांचा वापर करून संस्था ताब्यात घेणाऱ्या टोळ्यांचा सध्या सर्वत्र सुळसुळाट दिसून येत आहे. साहित्यसंस्था त्यांच्या केंद्रस्थानी आहेत. साहित्यबाह्य शक्तींना रोखण्यासाठी संस्थेतील कार्यकर्त्यांनी खंबीरपणे भूमिका घेऊन लढा उभारला पाहिजे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. 61 वर्षे अव्याहतपणे काम करून संस्थात्मक कार्याचा आदर्श वस्तूपाठ उभा केला आहे, अशा शब्दात त्यांनी साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचे कौतुक केले.

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल साहित्यप्रेमी भगिनी मंडळाला आदर्श संयोजक पुरस्कार प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते आज (दि. 2) प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या अध्यक्ष अंजली कुलकर्णी यांनी पुरस्कार स्वीकारला. 
साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या कार्यकारी विश्वस्त डॉ. मंदा खांडगे, रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर यांची उपस्थिती होती. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रम झाला.

प्रा. मिलिंद जोशी पुढे म्हणाले, एखाद्या पारंपरिक अथवा अभिमत विद्यापीठाने संशोधनाचे जे काम करायला हवे ते कोणत्याही पायाभूत सुविधा आणि अनुदानाशिवाय साहित्यप्रेमी भगिनी मंडळाने केलेले आहे. मराठी साहित्यातील संशोधनाचे दालन या संस्थेच्या संशोधनात्मक प्रकल्पामुळे समृद्ध झाले आहे. ते पुढे म्हणाले, ज्या महाराष्ट्राला महात्मा गांधी यांनी कार्यकर्त्यांचे मोहोळ असे म्हटले होते त्या महाराष्ट्रात आज कुठे गेले कार्यकर्ते असा प्रश्न उपस्थित होताना दिसतो. संस्थात्मक कार्यासाठी कार्यकर्त्यांचा पुरवठा करण्याचे काम आजवर समाजातील मध्यमवर्गाने केले. संस्थांची संस्थाने झाली की चळवळ संपते. संस्थात्मक कार्य करताना समाज मानस समजून घेत वेध-प्रबोध शक्तीचा वापर होणे आवश्यक आहे. समाजाने साहित्याभिमुख होणे गरजेचे असून सकारात्मकतेचा दीप सतत मनात ठेवून संस्थात्मक पातळीवर कार्य केल्यास ते यशस्वी होते.  

सत्काराला उत्तर देताना अंजली कुलकर्णी म्हणाल्या, साहित्यप्रेमी भगिनी मंडळ सातत्याने साहित्यिक उपक्रम राबवित आहे. या मंडळातर्फे गेली २८ वर्षे संशोधनात्मक कार्य अविरतपणे सुरू आहे हा संस्थेचा मानबिंदू आहे. डॉ. मंदा खांडगे यांच्या प्रयत्नाने सर्व साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे स्त्री साहित्य मुख्य प्रवाहात आणले गेले. 
संस्थेच्या स्थापनेपासूनच्या आठवणी सांगत डॉ. मंदा खांडगे म्हणाल्या, एखाद्या संस्थेला उत्तम कार्यकर्ते लाभल्यास ती संस्था अवितरपणे कार्यरत राहू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे साहित्यप्रेमी भगिनी मंडळ होय. 

सुरुवातीस ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविकात रंगत-संगत प्रतिष्ठानच्या वाटचालीची माहिती विशद करत पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट केली. मानपत्राचे लेखन प्रभा सोनवणे यांचे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरुपमा महाजन यांनी केले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आयोजित निमंत्रितांच्या कविसंमेलनात प्रभा सोनवणे, आश्लेषा महाजन, शलाका माटे, मृणाल जैन, वासंती वैद्य, तनुजा चव्हाण, ऋचा कर्वे, यामिनी रानडे, आरती देवगावकर, नंदिनी चांदवले, कांचन सावंत, ज्योती देशपांडे यांचा सहभाग होता. सूत्रसंचालन प्राजक्ता वेदपाठक यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या एअरटेल,वाकडेवाडी येथील शाहबाद अहमद ह्या टिम लीडर ला मनसे स्टाईल चोप :

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी